दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ८० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

Foto
 पुणे : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या विषयावरुन वादंग माजला असताना आता महाराष्ट्रात मराठी भाषेची परिस्थिती फारशी सुखावह नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (   २०२६) ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, महाराष्ट्राच्यादृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडणार्‍यांपैकी तब्बल ८० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.

या परीक्षेत ३५ विषयांपैकी १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. मात्र, त्याचवेळी प्रथम भाषा मराठी असणार्‍या १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थ्यांपैकी ८० हजार ८०३ विद्यार्थी म्हणजे जवळपास ७ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठीची निवड करणार्‍या ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. आगामी काळात ही मराठी भाषेच्यादृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे.
 
शिक्षणतज्ज्ञांच्या मते शुद्धलेखनातील चुका आणि वाचनाचा अभाव यामुळे मराठी भाषेतील अनुत्तीर्णांची संख्या वाढली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड आणि शिकवण्याच्या पद्धतीत बदल करावा. तसेच मराठी विषय दहावीपर्यंत अनिवार्य  असलेल्या कायद्यात सुधारणा करुन मराठी बारावीपर्यंत अनिवार्य करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.

यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (    ) लागला असून ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे. 

गुजराती भाषेत १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, अरेबिक भाषेतही ९९ टक्के विद्यार्थी पास
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून गुजराती भाषेची निवड करणार्‍या ३०२ विद्यार्थ्यांपैकी सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर संस्कृत ही द्वितीय किंवा तृतीय भाषा निवडणार्‍या ९६ हजार ३३१ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ५७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अरेबिक भाषेचा निकाल ९९.५९ टक्के लागला आहे.